मुंबई : साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपली मक्तेदारी कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी १०९ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करीत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशात १०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात मुळ अंदाजापेक्षा १५ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.
गतवर्षी पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यात हंगामाच्या सुरुवातीस ८५ लाख मेट्रीक टन तर सुधारित अंदाजानुसार ९५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्याप्रमाणे देशातही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता केंद्राने वर्तविली होती. त्यामुळे २०२३-२४चा गाळप हंगाम सुरू होताच, डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. परिणामी साखरेचे उत्पन्न वाढले. राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या २०७ साखर कारखान्यांपैकी १८९ बंद १५ एप्रिलपर्यंत झाले. मराठवाडय़ातील १८ कारखान्यांचे गाळप अद्याप सुरु आहे. आतापर्यंत १०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून यात आणखी वाढीची अपेक्षा आहे.
हेही वाचा >>>सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
उत्पन्नात अल्प घट
देशात ५३५ कारखान्यांनी आतापर्यंत ३१८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादित केली आहे. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा ८३ टक्के आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तर प्रदेशात १२१ कारखान्यांनी १०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून कर्नाटकात ७६ कारखान्यांनी ५० लाख टन साखर निर्मिती केली आहे. देशभरात गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न १२ लाख टनांनी घटले असले, तरी अद्याप काही ठिकाणी हंगाम सुरू असल्याने ही तूट काहीशी भरून निघेल.
जानेवारी-फेब्रुवारीत झालेला पाऊस उसासाठी फायदेशीर ठरला आहे. साखर उतारा चांगला मिळाल्याने व इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळेही साखर उत्पादन वाढले आहे. – संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघ