तातडीने अवर सचिव सुनील धोंडे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याचे ठरवून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक स्थगित करण्याचे आदेश बुधवारी दिले. मात्र राज्य सरकारने तातडीने निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करून पात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्त करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर असलेला प्रशासक राज संपविण्यासाठी ३ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहेत. कायद्यानुसार निवडणूक अधिकारी हा अवर सचिव पदाचा असणे बंधकारक आहे. मात्र परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांचे पद हे अवर सचिव किंवा समकक्ष नसल्याचा दावा करून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र दंत परिषदेचे निबंधक यांना प्रथम वैद्यकीय परिषदेचे प्रभारी निबंधक म्हणून नियुक्त केले.

त्यानंतर त्याच दिवशी त्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तातडीने त्याच्याकडील परिषदेच्या निबंधकाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच याचिकाकर्त्यांनी निवडणूक अधिकारी हे अवर सचिव पदाच्या दर्जाचे असण्याबाबत मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारी वकीलांनी निवडणूक अधिकारी हे अवर सचिव पदाप्रमाणेच वेतनश्रेणी घेत असल्याचा युक्तीवाद केला.

मात्र त्यांचे पद हे अवर सचिव किंवा समकक्ष असण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण सरकारी वकीलाकडे नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले. तसेच मागील दोन वर्षांपासून निवडणूक झालेली नसल्याने तातडीने अधिकारी नियुक्त करून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच यासंदर्भातील पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

तातडीने नव्या निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक स्थगित करण्याच्या दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने परिषदेसाठी नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी शिल्पा परब यांची नियुक्ती तातडीने रद्द करून त्यांच्या जागी अवर सचिव सुनील धोंडे यांची नियुक्ती केली. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची ३ एप्रिल रोजी होणारी निवडणूक ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. तसेच निवडणूक सुरळीत पार पाडण्यासंदर्भात व त्यावर देखरेख ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले डॉक्टर हे न्यायालयाच्या निर्णयामुळे काहीसे निश्चिंत झाले होते. मात्र राज्य सरकारच्या वेगवान निर्णयामुळे पुन्हा कामाला लागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.