मराठी माणूस अनेक क्षेत्रांत पिछाडीवर आहे किंवा मागे पडतो, असा तक्रारीचा सूर नेहमी आळविला जातो. पण जो महाराष्ट्र दुग्धोत्पादनात आघाडीवर आहे, तो दूध पिण्यात मात्र अन्य राज्यांच्या तुलनेत खूप मागे आहे. पंजाबी माणूस मराठी माणसाच्या चौपटीने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करतो आणि दुग्धसेवनातही देशात आघाडीवर आहे. मात्र ज्या राज्यात कुपोषण मोठय़ा प्रमाणावर आहे, तेथे दुधाचे उत्पादन प्रचंड होऊनही ते रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत असून चहा आणि मद्य सेवनात मात्र आघाडी आहे.
महाराष्ट्रात दररोज एक कोटी २० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते आणि खप जास्तीत जास्त एक कोटी लिटर इतकाच होतो. सणासुदीच्या दिवसात केवळ पाच टक्क्य़ांनी मागणी वाढते. आता दिवाळीनंतर पुन्हा मागणी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यात २० लाख लिटरहून अधिक दूध शिल्लक राहात असून त्याचे करायचे काय, असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई असूनही दुग्धोत्पादन वाढल्याने गाईच्या दुधाला सरकारने १७ रुपये प्रतिलिटरचा भाव ठरवून देऊनही शेतकऱ्यांकडून १४ ते १५ रुपये दराने ते खरेदी केले जात आहे. सुमारे १४,८०० मे.टन  दुधाची भुकटी शिल्लक असून आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्याने निर्यातही थंडावली आहे.
त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतच दूध आणि लस्सी, श्रीखंड, आईस्क्रीम, पनीर, मिठाई अशा दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा दरडोई खप दररोज केवळ २०० मिली इतका असून पंजाब व हरयाणामध्ये तो चौपट म्हणजे ८०० मिलीपर्यत आहे. त्यामुळे पंजाबी माणूस सर्वसाधारणपणे अंगािपडाने मजबूत आणि धट्टाकट्टा असतो. महाराष्ट्रात मात्र लहान मुलेही हल्ली शीतपेये व चहा भरपूर पितात आणि दूध मात्र पीत नाहीत. खेडोपाडीही घरचे दूध असूनही चहा पिण्याची सवय वाढीस लागली आहे. खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांवरून त्याच्याच जाहिराती मोठय़ा प्रमाणावर असतात. दुधाचे सेवन आरोग्य अतिशय आवश्यक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे ‘संडे हो, या मंडे, रोज खाए अंडे’, अशा जाहिराती केल्या गेल्या, त्या धर्तीवर दुधाचा खप वाढविण्यासाठी दुग्धसेवनाच्या जाहिराती राज्य सरकारने केल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त दुध व दुग्धजन्य पदार्थाचे सेवन लोकांनी करावे, यासाठी उद्युक्त केले पाहिजे, असे राष्ट्रीय सहकारी दूध फेडरेशन आणि राज्य सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सांगितले.