मुंबई : पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले नाव नाशिक मतदारसंघात उमेदवारीसाठी निश्चित केले होते. त्यानुसार महायुतीने नाशिकबाबत ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता. पण तीन आठवडे झाले तरी निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही संदिग्धता कायमची दूर करण्यासाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जाहीर केले. भुजबळाच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाटयाला जाणार याचा तिढा गेले तीन आठवडे सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघार घेण्यास तयार नव्हते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपला सोडल्यावर नाशिकचा तिढा सुटण्यास मदत झाली. हा मतदारसंघ शिंदे यांच्या गटाकडे कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माघारीची घोषणा केली.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये शिंदे गटाचा मार्ग मोकळा; गोडसे की बोरस्ते ?कोणाला उमेदवारी? 

 नाशिकच्या जागेसाठी आपले नाव अमित शाह यांनीच कशाप्रकारे सुचवले याचा घटनाक्रमही जाहीर केला. होळीच्या दिवशी आपल्याला अजित पवार यांचा निरोप आल्यानंतर आपण देवगिरी बंगल्यावर पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची भेट घेतली. त्यावेळी जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा झाली असून नाशिकच्या जागेवर तुम्ही लढावे, अशी अशी सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. आम्ही समीर भुजबळ यांचे नाव सुचविले होते. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी भुजबळ यांनीच तेथून निवडणूक लढवावी असे सांगितल्याचे पवार यांनी आपल्याला सांगितले. तसेच या ठिकाणी सध्याचे शिवसेना खासदार गोडसे यांची समजूत आम्ही काढतो असेही शहा यांनी सांगितल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पुन्हा खात्री करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही विचारणा केली, तेव्हा अमित शहा यांनी तुम्हालाच नाशिकमधून लढायला सांगितले आहे. तुमच्याच नावाचा आग्रह धरला असल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. त्यानुसार आपण नाशिकला जाऊन तयारी सुरू केली, असे भुजबळ यांनी सांगितले.

शिवसेनेच्या हटवादी भूमिकेबाबत नाराजी

आपल्याला उमेदवारी देणार हे स्पष्ट असताना पुन्हा चर्चा का सुरू झाल्या हे कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला असून ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत. पण तीन आठवडे होऊनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे महायुतीने नाशिकबाबत ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता. नाशिकची संदिग्धता कायमची दूर करण्यासाठी आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ  पक्षाच्या नेत्यांविषयी आपली नाराजी नाही. पण तिढा सुटावा म्हणून आपण भूमिका जाहीर केल्याचे सांगतानाच त्यांनी शिवसेनेच्या हटवादी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra minister bhujbal says he is withdrawing from race for nashik lok sabha ticket zws