निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या कंत्राटदाराला जलयुक्त शिवार योजनेतील कामे देण्याचे निर्देश दिल्यामुळे चिक्की प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मंत्री पंकजा मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ‘शासनाच्या निधीचे नुकसान होऊ नये,’ असे कारण देत घाईघाईने सुमारे दीड कोटी रुपयांची १२ कामे पंकजा मुंडे यांनी या कंत्राटदाराला दिल्याचे उघडकीस आले आहे.
परभणी जिल्ह्य़ातील ही कामे असून त्यातील सात कामांसाठी व पाच कामांसाठी अशा दोन निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुनील हायटेक कंपनीची निविदा किमान किमतीपेक्षा १५.५ टक्क्य़ांनी कमी होती, तर विजय कंपनीची सुमारे १० टक्क्य़ांनी कमी होती. दोन्ही निविदांमध्ये आणखीही काही निविदा आल्या होत्या. पण सर्वात कमी रकमेची निविदा भरलेल्या सुनील हायटेक कंपनीच्या कागदपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरीच केलेली नव्हती. कंत्राटांच्या छाननीमध्ये ही बाब उघड झाल्यावर त्यांच्या निविदा अपात्र ठरल्या. पण त्यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली. ही कंपनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांची असून, गंगाखेड येथे त्यांचा साखर कारखानाही आहे, असे सांगण्यात येते.
जलयुक्त शिवार योजनेतील कामे देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहेत. याबाबत विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनीही मुंडे यांना अहवाल दिला होता. तरीही त्यांनी ही कामे देण्याची घाई केल्याने २४ एप्रिल रोजी विभागाने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले असून, मुंडे पुन्हा वादात अडकल्या आहेत. या संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण करतील, असे सांगण्यात आले.
पंकजा मुंडे आणखी एका वादात!
निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या कंत्राटदाराला जलयुक्त शिवार योजनेतील कामे देण्याचे निर्देश दिल्यामुळे चिक्की प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मंत्री पंकजा मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-07-2015 at 01:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra minister pankaja munde stuck in fresh controversy