संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक आकर्षण ठरलेला आणि मानवी मनोऱ्यांच्या साहाय्याने रोमांच उभे करणारा दहीहंडी किंवा गोविंदा उत्सवाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करावा का, याबाबत निर्णय घेण्यावरून सरकारच्या स्तरावर अद्यापही कारवाईची टोलवाटोलवीच सुरू आहे. दहीहंडीला क्रीडाप्रकार ठरविण्याबाबतचा धाडसी निर्णय घेण्यास सरकारी यंत्रणा कच खाऊ लागली आहे. आता फक्त समिती स्थापन करायची आणि समिती काय अहवाल देईल, त्यानुसार निर्णय घ्यायचा, अशा अगदी तळाच्या थरावरच सरकार थांबले आहे.
दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करून या महोत्सवाला सरकारने प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांनी मुंबई व ठाण्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्या वेळी क्रीडा विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले होते. दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर त्याबाबत काही तरी सरकारी निर्णय जाहीर होईल, अशी गोविंदा पथकांची अपेक्षा होती. परंतु काहीही निर्णय झालेला नाही.
गोविंदाला खेळाचा दर्जा देण्यावरून सरकार पातळीवर क्रीडामंत्री वळवी यांनीच घोळ घातल्याचे मंत्र्यांचे मत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्र्यांचा विरोध असतानाही वळवी यांनी दाखविलेल्या अतिउत्साहाचीच चर्चा सुरू आहे. सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, राम कदम यांच्यासह काही लोकप्रतिनिधी दरवर्षी लाखोंच्या हंडय़ा उभारतात. दहीहंडय़ांवर त्यांच्या मंडळांकडून लाखो रुपये उधळले जातात. यातूनच दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी पुढे आली. गेल्या वर्षी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात यावरूनच आक्रमक भूमिका घेतली होती. क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी आमदारांच्या मागणीवरून खेळाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री चव्हाण मात्र याला फारसे अनुकूल नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सडेतोड भूमिका मांडली होती.  सरकारच्या पातळीवर दहीहंडीचे लाड करण्याची भूमिका नसतानाही काही आमदारांच्या मागणीवरून खेळाचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री विरोधात असतानाही वळवी यांनी दाखविलेल्या अतिउत्साहामुळे सरकारच अडचणीत येणार आहे.
या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय आमदार व अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार  आहे. या उत्सवाला साहसी उपक्रमात समावेश करायचे म्हटले तर त्यावर सरकारचीही काही बंधने येऊ शकतात. गोविंदांच्या थरांबाबतचा निर्णय मंडळांना मान्य होईल का, हा प्रश्न आहे. उत्सवावर काही र्निबध आणले तर, धार्मिक भावना दुखावल्याचीही ओरड होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व मुद्दय़ांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागेल.
 – पद्माकर वळवी, क्रीडा व युवक कल्याणमंत्री

Story img Loader