लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने आता मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता राजभवनावर नव्या मंत्र्यांना पदाची थपथ देण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि शरद गावित या पैकी दोघांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज्यातील पराभवाच्या कारणांबद्दल चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांना पक्षाने निलंबित केल्यानंतर एका कॅबिनेट मंत्रिपदाची जागा सध्या रिक्त आहे. त्याचबरोबर परभणीतील पक्षाच्या उमेदवाराला मदत न केल्यामुळे आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी दुसऱया कोणाला तरी संधी दिली जाणार आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी सूर्यकांता पाटील यांचे नाव आघाडीवर असून, राज्यमंत्रीपदी आव्हाड किंवा शरद गावित यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader