निलंबित आमदारांना पकडण्यासाठी बेकायदेशीरपणे विधानभवनात घुसखोरी केलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत कामकाज रोखले. या आमदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही तोवर अपमान सोसत कामकाज करणार नाही, असा इशाराही आमदारांनी सरकारला दिला.
पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच आमदारांच्या निलंबनाची घोषणा होताच लगेचच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विधान भवनाच्या आवारातच सापळा लावला. या आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी बेकायदेशीरपणे विधान भवनातही घुसलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी कालपासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली होती. विधानसभेत शुक्रवारी कामकाजाला सुरुवात होताच त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाले. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा व आमदारांचे निलंबन मागे घ्या, त्याशिवाय कामकाज करणार नाही, असे भाजपचे गिरीश बापट यांनी ठासून सांगितले. त्यास संपूर्ण सभागृहाने पाठिंबा दिला. गोंधळ वाढल्याने दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. आमदार ठाकूर यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली, याबद्दल सरकारने खुलासा करावा, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याला सभागृहातील सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती शिवाजीराव देशमुख यांनी पहिल्यांदा १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्या वेळेस आमदारांचे निलंबन रद्द करा, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. अखेर गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाजही तहकूब करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा