मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. पदवीधरांना मतदानाबाहेर मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे मोठे आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होत असल्याने मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे सर्वच उमेदवारांसमोर आव्हान आहे. विशेषत: कोकण पदवीधर मतदारसंघ तर ठाण्यापासून पार सिंधुदुर्गमध्ये गोव्याची सीमा तर पालघरमध्ये गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेला असल्याने तेथे मतदानाची टक्केवारी वाढविणे हे जिकरीचे ठरते. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपापली यंत्रणा कामाला लावली आहे. कोकण आणि नाशिकमध्ये तालुका पातळीवर उमेदरवारांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविली आहे. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असेल. नोंदणी केलेले मतदार मतदानासाठी बाहेर पडतील यासाठी राजकीय पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा >>> अंत्यविधी सुरू असताना मधमाशांचा हल्ला, पोलादपूर येथील वडघर येथील घटना; पंधराहून अधिक ग्रामस्थांना डंख

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान आहे. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत येेणे हेच या मतदारसंघात मोठे आव्हान आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघातील निवडणूक ही पैसे, साड्या वाटपांच्या आरोपांमुळे अधिक गाजली. शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.

मतदारांना सुट्टी

पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासनाने विशेष नैमित्तिक सुट्टी मंजूर केली आहे.

सद्या राजकीय स्थिती

मुंबई पदवीधर – शिवसेना ठाकरे गट मुंबई शिक्षक – लोकभारती कोकण पदवीधर – भाजप नाशिक शिक्षक – अपक्ष (शिंदे गट)