Maharashtra Breaking News Updates : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. पहिले दोन दिवस भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथिक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे गाजला. विरोधकांनी किरीट सोमय्यांच्या व्हिडीओची चौकशी करून कारवाईची मागणी केली. तसेच वाढते खतांचे दर आणि बोगस बियाणे यावरून सरकारला धारेवर धरलं. आज (२० जुलै) अधिवेशनात रायगडमधील दरड कोसळण्याच्या घटनेवरून चर्चा होत आहे. एकूणच अधिवेशनातील प्रत्येक घडामोडीची अपडेट फक्त एका क्लिकवर…

Live Updates

Monsoon Session of Maharashtra Assembly Updates, 20 July 2023 : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनातील प्रत्येक घडामोडीची अपडेट फक्त एका क्लिकवर...

18:04 (IST) 20 Jul 2023
"मी रोहित पवारांना कधीतरी एकांतात...", भर अधिवेशनात धनंजय मुंडेंचा टोला

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, कधी कुणावर काय जबाबदारी येईल याचा काही नेम नाही. यावर रोहित पवारांनी कशी असा प्रश्न केला. यावर धनंजय मुंडेंनी कशी जशी रोहित पवारांना कर्जत-जामखेडमध्ये जबाबदारी मिळाली, तशी मला जबाबदारी मिळाली, असं प्रत्युत्तर दिलं. यावर रोहित पवारांनी लोकशाही आहे, असं उत्तर दिलं. यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, तुमची लोकशाही सोयीची आहे. मी रोहित पवारांना कधीतरी एकांतात लोकशाहीची व्याख्या सांगेन. हे सार्वजनिक सभागृहात सांगणं उचित नाही.

17:25 (IST) 20 Jul 2023
विरोधी बाकावर बसल्यावर अंगात येतंच - धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने शेतीसंबंधित अनेक विषय मांडले. काही विधायक सूचना केल्या, काही टीकाही केल्या. काही जबाबदार सदस्यांनीही टीका केली. विरोधी बाकावर बसल्यावर अंगात येतंच.

- धनंजय मुंडे (कृषीमंत्री)

15:38 (IST) 20 Jul 2023
सरकारने शेतकऱ्यांना पंचामृत दिले की विष दिले हा प्रश्न - नाना पटोले

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं की, आम्ही पंचामृत योजनेत शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी करू. राज्यातील पीकविमा व्यापक प्रमाणात राबवली जात आहे. मात्र, त्यांनी केवळ मोठमोठे शब्द वापरले. आता सरकारने पंचामृत दिले की विष दिले हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. मोठे मोठे शब्द वापरल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात असं सत्ताधाऱ्यांना वाटतं.

- नाना पटोले

15:13 (IST) 20 Jul 2023
गाडगीळ समितीचा अहवाल जाहीर करा - नाना पटोले

डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार केंद्रात होतं आणि जयराम रमेश केंद्रीय पर्यावरण मंत्री होते त्यावेळी माधवराव गाडगीळ समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने अहवाल सादर केला आणि तो पुढे आलाच नाही. या घटना घडू नये म्हणून गाडगीळ समितीचा अहवाल काय होता हे समजणे गरजेचं आहे. अन्यथा समित्या बनवल्या जातात, त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.

- नाना पटोले

13:43 (IST) 20 Jul 2023
"विरोधी बाकावर असताना छगन भुजबळांचा बोलून घसा कोरडा झाला आणि आज...", नाना पटोलेंचा हल्लाबोल

छगन भुजबळ आधी विरोधी बाकावर इकडं बसत होते. आता ते सत्ताधारी बाकावर आहेत. मात्र, सरकारने अद्याप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिलेली नाही. विरोधात असताना छगन भुजबळांचा या विषयावर बोलताना घसा कोरडा झाला होता. त्यावेळी सरकारने भुजबळांच्या प्रश्नाला उत्तर देताना मदतीची घोषणा केली होती. आता छगन भुजबळ यांची भाषा बदलली आहे.

- नाना पटोले

12:44 (IST) 20 Jul 2023
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात माहिती

रायगड जिल्ह्यातल्या इरसालवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत मात्र खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. सरकार प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

11:53 (IST) 20 Jul 2023
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या सन्मान कार्यक्रमातील मृत्यूप्रकरणी अधिवेशनात खडाजंगी

खारघरमधील आप्पासाहेब धर्माधिकारींच्या सन्मान कार्यक्रमात झालेल्या नागरिकांचा मृत्यू आणि कार्यक्रमातील व्यवस्था यावरून महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राजकारण होत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

Maharashtra Monsoon Session Live 2023 Day 4

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.

Story img Loader