राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ मनसेचा हल्ला
कोणत्याही परिस्थितीत आणि कशाही पद्धतीने निवडणूक जिंकायची हेच एकमेव लक्ष्य ठेवून ‘पार्टी विथ डिफरन्स’चा एके काळी अभिमान बाळगणाऱ्या भाजपची वाटचाल आता ‘पार्टी विथ क्रिमिनलायझेशन’च्या दिशेने सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिक तसेच औरंगाबादमध्ये भाजपने गुंडांची ‘भरती’ सुरू केल्याची टीका मनसेने केली आहे. राज्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. भाजपने गुंडांची भरती सुरू केल्यामुळेच गुन्हेगारी कमी झाल्याचा शोध त्यांना लागला असावा, असा टोलाही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी हाणला आहे.
शिवसेना व भाजपविरोधात आक्रमक प्रचार करण्याची योजना मनसेने आखली आहे. समाजमाध्यांचा प्रभावी वापर प्रचारात मनसे करणार आहे. दादर-माहीममध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते पहिली ‘वॉर रूम’ सुरू करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रचाराच्या वेळी केलेल्या घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा तसेच शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचा प्रभावी वापर करून हे दोन्ही पक्ष लोकांची कामे करण्याऐवजी केवळ फसव्या घोषणाबाजी कशा प्रकारे करीत आहेत, हे मनसेकडून आगामी काळात दाखवून दिले जाणार आहे.