महायुतीत चौथा भिडू नको, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या मुखपत्रातून घेण्यात आल्यानंतरही राज व उद्धव यांनी एकत्र यावे अशीच भूमिका शिवसेना व भाजप नेते मांडत असल्यामुळे महायुतीत मनसेला घेण्याविषयी अजूनही संभ्रमावस्था असल्याचेच दिसत आहे. या महागोंधळाला ‘सामना’मधील अग्रलेखच जबाबदार असल्याची कुजबूज भाजपमध्ये सध्या सुरू आहे. चौथा भिडू नको, अशा शब्दांत सुरुवात करून योग्यवेळी पाहाता येईल, असा शेवट करणाऱ्या अग्रलेखामुळेच हा संभ्रम वाढल्याचे भाजपमध्ये बोलले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे सातत्याने मनसेने महायुतीत यावे यासाठी आग्रही राहिले. नितीन गडकरी यांनी तर राज व उद्धव यांना एकत्र आणण्याचा विडाच उचलला. त्यामुळे रिपाइंच्या रामदास आठवले यांनीही तसाच सूर आळविला. मात्र यानंतरही राज ठाकरे यांच्याकडून एका शब्दानेही प्रतिक्रिया न आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने चौथा भिडू नको, अशी भूमिका घेत भाजप नेते व रामदास आठवले यांच्या ‘राज’कारणावर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर मनसेबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असा सूर गोपीनाथ मुंडे व रामदास आठवले यांनी आळवला होता. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज व उद्धव यांनी एकत्र यावे अशी भूमिका मांडल्यामुळे ‘मनसे’ महागोंधळ सुरू झाला. रामदास कदम यांच्यावरही आता सामनातून टीका करणार का, असा उघड सवाल आठवले यांनी केला. तर राज व उद्धव यांनीच आता निर्णय घ्यावा असे गोपीनाथ मुंडे यांनी सांगून टाकले.
मुंडे यांची भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका असल्याचे भाजप प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगून टाकले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या ‘राजभेटी’मुळे संभ्रम निर्माण झाल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ‘सामना’मधूल सूर जरी महायुतीत राज यांना घेण्याच्या विरोधातील असला तरी ‘वेळ आल्यावर पाहू’ या वाक्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न सेनेतूनही उपस्थित होत आहे. मनसेला सातत्याने साकडे घालण्यात येत असतानाही राज ठाकरे अजूनही गप्पच आहेत. त्यामुळे राज महायुतीत येऊ शकतील, अशी आशा बाळगून भाजप व सेनेच्याच नेत्यांकडून ‘दार उघड बये दार उघड’चा हाकारा सुरू आहे. सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला महायुतीतील ‘मनसे’ गोंधळाविषयी विचारले असता, परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्धव ठाकरे हेच भूमिका स्पष्ट करू शकतील असे सांगितले.
दार उघड बया दार उघड
‘सामना’मधूल सूर जरी महायुतीत राज यांना घेण्याच्या विरोधातील असला तरी ‘वेळ आल्यावर पाहू’ या वाक्याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न सेनेतूनही उपस्थित होत आहे. मनसेला सातत्याने साकडे घालण्यात येत असतानाही राज ठाकरे अजूनही गप्पच आहेत. त्यामुळे राज महायुतीत येऊ शकतील, अशी आशा बाळगून भाजप व सेनेच्याच नेत्यांकडून ‘दार उघड बये दार उघड’चा हाकारा सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा