आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असताना, राजकीय फायद्या-तोटय़ाच्या कोणत्याही गणितात न अडकता पक्षविस्ताच्या दृष्टीने ‘एकला चलो रे’,हिच भूमिका घेऊन स्वबळावर लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढविणार असा छातीठोक दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. तरीही, आपापल्या फायद्याचे एकतर्फी प्रयत्न महायुती आणि काँग्रेसकडून सुरूच असून राज यांना महायुतीत घेण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे तर मनसेने निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या तर आपला फायदा आहे असे गणित काँग्रेसकडून मांडण्यात येत आहे.
शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्रपणे लढल्याचा फायदा मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याकडे टाळीसाठी पुढे केलेला हात झिडकारत राज यांनी त्याला ‘टाटा’ केल्यानंतरही भाजपचे नेते मात्र मनसेला महायुतीत घ्यावे अशी भूमिका मांडत राहिले. मात्र कोणताही ठोस प्रस्ताव नसल्यामुळे राज यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. ‘रालोआ’चे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून राज महायुतीत आल्यास महाराष्ट्रातून ३० ते ३५ जागा जिंकण्याची आशा भाजप नेत्यांना वाटत आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर मोंदींच्या उमेदवारीवरून भाजपत असलेली नाराजी, राज्यातील भाजप नेत्यांमधील दुफळी, रिपाईची धरसोड भूमिका आणि शिवसेनेचा ‘बेपत्ता’ कारभार या खिचडीत सामील होण्यास राज ठाकरे तयार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
राज्यात व देशपातळीवर महागाई-भ्रष्टाचार यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात जनमत आहे तर विरोधी पक्ष कमकुवत असताना मनसेच्या वाढीसाठी ‘एकला चलो रे’ हीच राज यांनी भूमिका असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीत पवार साहेबांच्या ‘लकवा चाली’ वर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे या निकटवर्तीयांनी सांगितले.
मनसेच्या स्थापनेनंतर लगचेच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत मनसेला नऊ लाख ४३ हजार मते मिळून २७ नगरसेवक विजयी झाले. लोकसभा निवडणुकीतही सुमारे १५ लाख तर विधानसभा निवडणुकीत २५ लाख मते मिळाली होती.
मतांच्या या गणितामुळेच, परिणामी महायुतीच्या खिचडीत सामील होऊन तात्कालिक यश मिळविण्यापेक्षा मनसेची ताकद वाढविण्याकडे राज यांचा भर राहणार आहे.
‘एकला चलो रे!’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असताना,
First published on: 18-09-2013 at 03:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra navnirman sena fight lok sabha elections alone