महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी अंधेरीत मोर्चाची हाक दिली आहे. फेरीवाले, पाणी टंचाई या विषयासंदर्भात पालिका विभाग कार्यालयासमोर हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
महापालिकेची निवडणूक अद्याप घोषित झालेली नसली तरी पालिकेच्या वर्तुळात राजकारण आणि आंदोलने मात्र सतत सुरू आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महापालिकेचे विषय उचलून धरायला सुरूवात केली आहे. पश्चिम उपनगरातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या अंधेरी पश्चिम परिसरातील समस्याविरोधात आवाज उठवण्यासाठी मनसेने बुधवारी आंदोलनाची हाक दिली आहे.
हेही वाचा… मुंबई: फेरीवाल्यांची पदपथावर पथारी
हेही वाचा… ‘पंतप्रधान आवास’वर मर्जीतल्यांची वर्णी; राज्यात बोगस अभियंता, संगणक शिक्षिका आदींना पदे बहाल
अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या, त्यामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, पाण्याची समस्या या सर्व विषयांवर मनसेने हा मोर्चा आयोजित केला आहे. के पश्चिम विभाग कार्यालयासमोर दुपारी २ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वर्सोवा विधानसभेतील मनसेचे पदाधिकारी संदेश देसाई यांनी दिली. या परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि त्यांना अभय देणारे अधिकारी यांच्या विरोधातही या मोर्चातून आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.