काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या महाराष्ट्राच्या दुष्काळ दौऱ्यात सारी सरकारी यंत्रणा धावत होती. गुरांच्या छावण्या चकाचक करण्यात आल्याची वर्णने आली. या पाश्र्वभूमीवर मनसेने राज्यात ३८ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम सुरु केला तर दुसरीकडे शहरी भागात घराघरातून रद्दी जमा करून त्याच्या विक्रीतून एकेका गावाची तहान भागविण्याचे काम हाती घेतले आहे.
राज्यातील अनेक भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची माहिती घेऊन एका गावाला महिनाभरासाठी टँकरने पाणीपुरवठा कराण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन मनविसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ओंकार माळी यांनी घरोघरी फिरून महिन्याची रद्दी जमा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
 हा उपक्रम राबविताना लोकांनी आपल्या घरात पाणीबचत करण्याचा संदेशही ते देत आहेत. रद्दीच्या विक्रीतून येणाऱ्या निधीमधून दररोज नऊ हजार लिटर पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी तयार केली असून यातून एका गावाची म्हणजे सुमारे पंधराशे कुटुंबांची महिन्याची तहान भागविण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करून दुष्काळग्रस्त भागातील तहानलेल्या बांधवांची तहान भागविण्यासाठी ज्यांना महिन्याची रद्दी द्यायची असेल त्यांनी येत्या एक व दोन जून रोजी ९९२०५५४४३० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मनसे आपल्या घरी येऊन रद्दी घेऊन जाईल असे मनविसेच्या पत्रकात म्हटले आहे.