मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दादर – माहीम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन संवाद साधण्यावर भर दिला आहे. दादर – प्रभादेवी परिसरात प्रचारादरम्यान ‘आमच्या भविष्यासाठी काका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल. हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचाच. विजयी भव’, अशी थेट मागणी करणारे पत्रच मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येने अमित ठाकरे यांच्याकडे दिले आहे.

सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. दादर – माहीम विधानसभेत मनसेच्या अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी आई शर्मिला व पत्नी मिताली ठाकरे सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. दादर – प्रभादेवी परिसरात प्रचारादरम्यान अमित हे पत्नी मितालीसह मनसे पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या घरी गेले. यावेळी लक्ष्मण पाटील यांची कन्या उर्वशी पाटील हिने अमित यांना एक पत्र देत हट्टच केला. ‘अमितकाका आमदार बनायचंच ! आज आमच्या घरी तुम्ही अमित ठाकरे म्हणून आलात. पण पुढच्या वेळी आमदार अमित ठाकरे म्हणून या’, अशा आशयाचे पत्र देऊन उर्वशी हिने अमित यांच्याकडे दिले आहे. यावेळी अमित आणि मिताली या दोघांचे पाटील कुटुंबियांकडून औक्षणही करण्यात आले आणि त्यांच्यात संवादही झाला. यासंदर्भातील छायाचित्रे, चित्रफीत आणि संबंधित पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका

दरम्यान, अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान प्रभादेवी – दादर येथील समुद्रकिनारी स्थानिक मुलांसोबत मनसोक्तपणे फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला होता. तसेच त्यांनी जय फाऊंडेशनतर्फे आयोजित दादर चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत पत्नी मितालीसह सहभाग घेतला होता. त्यानंतर आता तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, अशी मागणी अमित ठाकरेंकडे करणाऱ्या या पत्राचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.