मुंबई : महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. १३३ आमदार निवडून आल्याने भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा असला तरी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. यामुळेच भाजपचे दिल्लीतील धुरिण कोणता निर्णय घेतात यावर सारे अवलंबून आहे.
महायुतीला मिळालेल्या यशात भाजपचा वाटा मोठा असल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि पहिली अडीच वर्षे शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असा आग्रह धरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. त्यामुळे मोठया बहुमतानंतरही भाजपने अडीच वर्षे थांबावे, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आल्याचे समजते.
हेही वाचा : महायुती सव्वादोनशेर!
भाजपला १३३ जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर १०५ आमदार असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपविले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाताहत करण्याची भाजपची खेळी होती. ती यशस्वी झाल्याने विधानसभा निकालाने सिद्ध केले आहे. परिणामी, आता शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची गरज नाही, असा भाजपमधील मतप्रवाह आहे. जातीचे समीकरण साधण्याकरिता एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, असा प्रस्ताव येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा समाजाच्या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसलेला नाही. या साऱ्या मुद्द्यांचा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना विचार होऊ शकतो. भाजपचे दिल्लीतील नेतृत्व कसा व कोणता विचार करते यावरही सारे अवलंबून आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली गेली. राज्यात राबविण्यात आलेल्या अनेक कल्याणकारी योजना, निवडणुकीत प्रभावी ठरलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ तसेच वेगवेगळ्या समाजांसाठी आखण्यात आलेल्या योजनांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या गेल्या त्यांनाच मुख्यमंत्री पदी बसवावे अशी आमच्या पक्षाची भूमीका आहे. महायुतीचे नेते एकत्रितपणे यावर सकारात्मक निर्णय घेतील हा विश्वास आहे. – नरेश म्हस्के, शिवसेना खासदार
मतांची टक्केवारी
●भाजप – २६.७७
●शिवसेना (शिंदे) – १२.३८
●राष्ट्रवादी (अ.प.) – ९.०१
●काँग्रेस – १२.४२
●शिवसेना (ठाकरे) – ९.९६
●राष्ट्रवादी (श.प.) – ११.२८
●मनसे – १.५५ टक्के
●नोटा – ०.७२ टक्के