दुष्काळ, बलात्कार व महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गंभीर प्रश्न राज्याला भेडसावत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वणीवर मुख्यमंत्र्यांचे चहापान स्वीकारण्यापेक्षा ‘उपवास’ करायचा आणि दुष्काळात जनता उपाशी असल्याचे दाखवायचे किंवा अभिनव पध्दतीने सरकारचा निषेध करायचा, असा विचार विरोधक करीत आहेत. त्यांचा पवित्रा बहिष्काराचा असून सरकारला खडसावण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारायचा, यावर विरोधी पक्षांच्या रविवारी सकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपराच झाली आहे. त्यामुळे सरकारही हे अस्त्र आणि विरोधकांची भूमिका गांभीर्याने घेत नाही. त्याऐवजी चहापानाला जाऊन चहा न घेता मुख्यमंत्र्यांना नाराजीचे खडे बोल सुनवायचे किंवा अभिनव पध्दतीने निषेध करायचा, असा विचार विरोधी पक्षांचे नेते करीत आहेत. तर केवळ बहिष्कार टाकावा, असे काही नेत्यांना वाटत आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भाजप, शिवसेना, मनसे नेत्यांची बैठक रविवारी सकाळी होईल. त्यावेळी चहापानाबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा