खासगी वीजप्रकल्पांनी महाराष्ट्राला वीजपुरवठा बंद केल्यानंतर राज्यातील संभाव्य वीजटंचाईवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले असताना गुरुवारी अचानक अदानी, टाटा पॉवर आणि इंडिया बुल्स या खासगी कंपन्यांनी पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे राज्याला ३३०० मेगावॉटचा वीजपुरवठा पुन्हा होणार असून राज्यावरील संभाव्य वीजटंचाईचे सावट दूर झाले आहे.
राज्यात विजेची मागणी रोज सरासरी १५ हजार मेगावॉटच्या आसपास असते. मात्र गेले काही दिवस राज्यभरात पाऊस पडल्याने विजेची मागणी घटून ११ ते १२ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस विजेची तूट आहे.
महाराष्ट्राला सरकारी वीजकंपनीबरोबरच अदानी, टाटा पॉवर, इंडिया बुल्स आदी खासगी वीजप्रकल्पांकडूनही वीजपुरवठा होतो. मात्र आयात कोळशाच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीचा मुद्दा उपस्थित करीत अतिरिक्त वीजदर द्यावा अशी भूमिका खासगी वीज कंपन्यांनी घेतली होती. इतर राज्यांबरोबर हा वाद सुरू होता. अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आयात कोळशाच्या दरवाढीपोटी जादा वीजदरास नकार दिला. त्यामुळे खासगी वीजकंपन्यांनी आपले वीजप्रकल्प विविध कारणे सांगत बंद केले. त्यातून महाराष्ट्राला ‘अदानी’कडून मिळणारी २५०० मेगावॉट, ‘टाटा’कडून मिळणारी ८०० मेगावॉट वीज बंद झाली. तर ‘इंडिया बुल्स’ची २५० मेगावॉट वीज कोळशाअभावी बंद पडली.
विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना वीजटंचाईचा धोका निर्माण झाल्याने त्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांच्यात जाहीर आरोप-प्रत्यारोप झाले. वातावरण तापत असताना अकस्मात गुरुवारी अदानी आणि टाटा पॉवर यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याची तयारी राज्य सरकारकडे दर्शवली. त्यामुळे राज्यावरील वीजटंचाईचे सावट दूर झाले आहे. खासगी वीजकंपनीच्या या मनपरिवर्तनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra out of power crisis