लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषदेमध्ये नोंदणी नसलेल्या व्यक्तींनी मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनधिकृतपणे प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळांमध्ये रक्त, लघवी आदी विविध चाचण्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना चाचण्याची चुकीचे अहवाल मिळाल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील विविध प्रयोगशाळांवर कारवाई करण्याची विनंती महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषदेने पोलीस महासंचालकांना केली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र परामेडिकल परिषदेकडे कोणतीही नोंदणी नसताना अनेकांनी सर्रास अनधिकृतपणे पॅरामेडिकल प्रयोगशाळा थाटल्या आहेत. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये या अनधिकृत प्रयोगशाळा चालविण्यात येत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात येत नाहीत. त्यामुळे या खासगी प्रयोगशाळा नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. तसेच त्यांची आर्थिक लूटही करीत आहेत. पॅरामेडिकल व्यवसायी म्हणून परिषदेकडे नोंद असलेल्या व्यक्तीचे नाव काही ठिकाणच्या प्रयोगशाळेतील फलकावर व लेटरहेडवर नमुद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याच नावाने रुग्णांना रक्त व लघवीचे अहवाल देण्यात येत आहेत. ज्यांच्या नावाने अहवाल देण्यात येतात, ते कधीच तेथे हजर नसतात.
आणखी वाचा-मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये कात टाकणार, गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू
परिषदेच्या नियमानुसार प्रयोगशाळेमध्ये नोंदणीकृत व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे. मात्र परिषदेकडे नोंदणी केलेल्या काही व्यक्ती वैयक्तीक स्वार्थासाठी कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रयोगशाळा चालविणारे आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तींविरूद्ध कठोर कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील रुग्ण, जनता आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत पॅरामेडिकल प्रयोगशाळा चालविणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तींवर महाराष्ट्र पॅरामेडिकल अधिनियम २०११ चे कलम ३१ व ३२ नुसार कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी विनंती महाराष्ट्र परामेडिकल परिषदेचे प्रशासक सतीश नक्षिने यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून केली आहे.