मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर्स रणवीर अल्लाहबादिया आणि आशिष चंचलानी हे सोमवारी नवी मुंबईतील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. ‘इंडियाज गॉट लेटंट’ कार्यक्रमादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दोन तास चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र सायबर कक्षाने त्याप्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधी, महाराष्ट्र सायबर विभागाने रणवीर अल्लाहबादियाला समन्स पाठवून सोमवारी चौकशीला बोलावले होते.

अल्लाहबादियावर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सायबर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. यापूर्वी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात होते. पण दोनवेळा अल्लाहबादिया उपस्थित राहिला नाही. खार पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात आशिष चंचलानी यांचा जबाब नोंदवला होता. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आतापर्यंत या कार्यक्रमाशी संबंधित ३० हून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, सायबर पोलिसांनी यूट्यूबशी संपर्क साधून संबंधित सर्व ध्वनीचित्रफीती हटवण्याची सूचना केली होती. दरम्यान, कार्यक्रमाचा आयोजक समय रैना हे सध्या भारताबाहेर असल्याची माहिती आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण न संपादित चित्रीकरण त्यांच्या ताब्यात आहे. ते त्यांच्या परतल्यानंतर जप्त करण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे. संबंधीत कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी चित्रीकरण करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Story img Loader