शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करत आपली भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोर आमदारांना समोर येऊन आपण मुख्यमंत्रीपदासाठी लायक नसल्याचं सांगावं असं आवाहन केलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची तयारीही दर्शवली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी यावेळी एक गोष्ट सांगत व्यथा मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंनी सांगितली कुऱ्हाडीची गोष्ट

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यामागची गोष्ट कोणाला माहिती नाही. ती गोष्ट अशी आहे की, एकदा एका जंगलात लाकूडतोड्या झाड तोडत होता. कुऱ्हाडीचे घाव घालत असताना तिथे राहणारे पक्षी कासावीस झाले. पण घाव घातले जात असताना झाडाला किती वेदना होत असतील. म्हणून ते पक्षी झाडासोबत बोलू लागले. पक्षांनी दादा खूप दुखत असेल ना? वेदना होत असतील ना? असं विचारलं. त्यावर झाडाने उत्तर दिलं की, मला वेदना आणि दु:ख घावांचं नाही, तर हा लाकूडतोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालत आहे, त्याचं लाकूड माझ्या फांदीचं आहे, याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललं आहे,” अशी व्यथा उद्धव ठाकरेंनी मांडली.

CM Uddhav Thackeray Live Updates : …तर मी लगेच राजीनामा देण्यास तयार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“राजकारणातील जन्मदात्री शिवसेनेवर तिचंच लाकूड वापरुन घाव कोणी घालू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

“मी राजीनामा देण्यास तयार आहे. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवत आहे. जे आमदार गायब आहेत किंवा त्यांना गायब केलं आहे त्यांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं. मला कोविड झाला असल्याने मी जात नाही. त्यातही राज्यपाल उद्धव ठाकरेंनी यावं सांगितलं तर येण्यास तयार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

CM Uddhav Thackeray on Eknath Shinde : “…तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन”, उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया!

“जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत तोवर मी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाईन. मी पाठ दाखवणारा नाही. काहीजण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असा आरोप करत आहेत. ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल त्यांनी सांगावं. मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. हे विरोधकांनी सांगू नये, असे फडतूस लोक फार आहेत. मी फक्त शिवसैनिकांना बांधील आहे. त्यांनी सांगितलं तर मी दोन्ही पद सोडण्यास तयार आहे. मी पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे. उद्धव ठाकरे नको पण दुसरं कोणी मुख्यमंत्री हवं असेल तर तेही चालेल, पण समोर येऊन सांगा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis cm uddhav thackeray eknath shinde facebook live sgy