शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांची खाती काढून घेतली असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने मात्र १२ जुलैपर्यंत त्यांना दिलासा दिला आहे. बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैठका आणि भेटींचा वेग वाढला आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांना इंजेक्शन देऊन मारहाण केली जात असल्याचा उल्लेख केला.
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे फडणवीस? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “जे बोलतात पुन्हा येईन…”
“ज्याप्रकारे आमदारांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं जात आहे, मारहाण केली जात आहे ही गोष्ट लपलेली नाही. एका आमदाराला ५० कोटी देण्याचा प्रयत्न झाला. घोडेबाजार सुरु आहे. यावर आमचं लक्ष असून आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंचाही दावा
“सूरतमधून विमानाने गुवाहीटाला नेतानाचे दोन तीन व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओत काही जण डुलत होते, ते कशामुळे मला माहिती नाही. पण दुसरा व्हिडीओ फार भयानक होता. जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटतं,” असं आदित्य ठाकरेंनी कर्जतमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना सांगितलं.
“महाराष्ट्रातील आमदारांचे सूरतमध्ये, गुवाहाटीला असे हाल होतात. याच्या मागे कोण आहे. कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? पण कोणीही यामागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, थांबणार नाही, झुकणार नाही,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.