आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान गुवाहाटीला येण्यासाठी आपल्यालाही फोन आला होता असा खुलासा देवेंद्र भुयार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. जे चित्र राज्यात दिसत आहे ते दोन दिवसानंतर बदललं असेल असा दावाही त्यांनी केला आहे.
“एकनाथ शिंदे यांच्यासोबतची सगळी यंत्रणा हालू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अपक्ष आमदारांना सोबत घ्या अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आमचे सहकारी मित्र असणाऱ्या दोन-तीन आमदार मित्रांचे फोन आले. मी त्यांना आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचं सांगितलं,” अशी माहिती देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.
“महाविकास आघाडी आजही अस्तित्वात आहे आणि भविष्यातही राहील. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. जे चित्र आहे दिसत आहे ते दोन दिवसानंतर बदललं असेल,” असा दावा देवेंद्र भुयार यांनी केला आहे.
“आधी सोबत गुवाहाटीला या त्यानंतर कोणतं मंत्रीपद द्यायचं वैगेरे त्यासंबंधी विचार करु असं मला सांगण्यात आलं होतं. मला तीन ते चार जणांचे फोन आले होते. पण त्यांचं नाव उघड करु शकत नाही. राजकीय गोपनियता ठेवावी लागणार आहे,” असंही ते म्हणाले.
“भाजपानेच हे षडयंत्र आखलं असून पडद्यामागून तेच सगळं करत आहेत. ५० टक्के ईडीचा आणि ५० टक्के भाजपाच्या प्रमुखांचा यात वाटा आहे. दोघांनी मिळून ठरवून हे सगळं केलं आहे,” असा दावा देवेंद्र भुयार यांनी केला आहे.