शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर अजित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहील असा निर्णय घेण्यात आला.

“शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. मी राजकारणात आल्यानंतर हे शिवसेनेतील तिसरं बंड आहे. मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं. हे सर्व पाहिलं तर बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर इतर सहकारी निवडूनही येऊ शकत नाहीत इतकं शिवसैनिक कष्ट घेतात. शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा मागील अनुभव आहे,” याची आठवण अजित पवारांनी करुन दिली.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का? अजित पवार म्हणाले, “कुठलाही भाजपाचा नेता किंवा…”

यावेळी अजित पवारांसमोर राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख केला असता ते त्यांच्या घरातील प्रकरण होतं असं ते म्हणाले. दरम्यान यावेळी अजित पवारांना हा शिवसेनेचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा डाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत जे काम केलं आहे, ते पाहता त्यांचा स्वभाव नाही. ते मोकळेपणाने मला असं करायचं आहे सांगतात”.

Maharashtra Political Crisis Live : आजपर्यंत शिवसेनेत बंड करणारे परत निवडून आले नाहीत : अजित पवार; वाचा प्रत्येक अपडेट…

“आम्ही आघाडीला पाठिंबा दिला आहे. आम्ही पाठिंबा काढणार नाही. मुख्यमंत्रीपदालाही पाठिंबा दिला असून शेवटपर्यंत साथ देणार आहोत,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

“आमदार, मंत्री, नेते ज्यांना सुरक्षा आहे ते जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुरक्षा देणारे काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यावर आहे. ते काय करत होते ही विचार करण्याची गोष्ट आहे,” असं अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं.

“काही आमच्यातील मित्रपक्ष थोडे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत. अजित पवारांनी निधीचा वापर केल्याचे बोलले जात आहे. मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे की, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले, त्यावेळी ३६ पालकमंत्री हे एक तृतीयांश काँग्रेस, एक तृतीयांश शिवसेना आणि एक तृतीयांश राष्ट्रवादीचे नेमले. त्यांना निधी देताना कुठेही काटछाट केली नाही. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला निधी देण्यात आला आहे. पण त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य का केले मला माहिती नाही. मी कधीही दुजाभाव केला नाही. सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची भूमिका माझी असते हे आपण पण पाहिले आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे काम मी करत असतो. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा सर्व मंत्री समोर असताना सांगितले असते तर तिथल्या तिथे गैरसमज दूर झाले असते. अशा काळामध्ये तिघांनी पण आघाडी कशी टिकेल आणि ही परिस्थिती कशी हाताळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Story img Loader