मुंबई : ‘‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत आपल्या गटातील आमदारांच्या बैठकीत केले. त्यांनी प्रथमच आपल्या पाठिशी भाजप असल्याचे सूचित केल्याने या बंडामागे भाजप असल्याच्या आरोपाला बळकटी मिळाली आह़े
शिवसेनेतील बंडात सामील झालेल्या पक्षाच्या आमदारांची संख्या गुरुवारी ३७ झाली. दोन राज्यमंत्र्यांसह ९ अपक्ष आमदार बरोबर असल्याने एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ झाले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची बंडखोरांची मागणी मान्य करण्यास शिवसेना तयार असल्याचा संदेश पक्षाकडून देण्यात आला होता. तसेच गुवाहाटीतील काही शिवसेना आमदार संपर्कात असल्याचा दावाही पक्षनेते संजय राऊत यांनी केला. यानंतर नगरविकास मंत्री व बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी प्रथमच आपल्या गटाची गुवाहाटीत बैठक घेत मार्गदर्शन केले. त्याचे चित्रिकरण प्रसारित करण्यात आले.
‘‘आपल्या पाठिशी मोठा पक्ष आहे. ती एक महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय पक्षाने सर्व मदतीचे आश्वासन दिले आह़े वेळप्रसंगी काहीही कमी पडणार नाही’’, अशी खात्री त्यांनी दिली आहे. आता आपले सर्वाचे सुखदु:ख एक आहे. आपण एकजुटीने राहायचे आहे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. त्यातून आपला गट एकसंध ठेवण्याचा प्रयत्न शिंदे करत असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या बैठकीत बंडखोर आमदारांनी निर्णयाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिल़े या बैठकीपूर्वी, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोर आमदारांचे मनोगत मांडल़े गेली अडीच वर्षे आमच्यासाठी ‘वर्षां’ची दारे बंद होती, असे सांगत आमदारांना अपमानास्पद वागणूक का देण्यात आली, असा सवाल त्यांनी या पत्रात केला आह़े या पत्राबरोबरच बंडखोर आमदारांची भूमिका मांडणारी शिरसाट यांची चित्रफीतही शिंदे यांनी ट्वीटरद्वारे प्रसृत केली आह़े
शिवसेना आमदारांच्या पळापळीमुळे संशय
मुंबई : मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षां’ हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेबरोबर असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी गुवाहाटीमध्ये जाऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. कृषीमंत्री दादा भुसे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी पाच आमदार