दगाफटका करणारे, पळून जाणारे जिंकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे असं राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. वरळीत सरकारी गृहयोजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जेव्हा ते आमच्यासमोर बसतील तेव्हा दुसऱ्यांदा विश्वासदर्शक ठराव असेल. डोळ्यात डोळे घालून आम्ही काय चुकीचं केलं सांगतील असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही याबद्दल किती विश्वास आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर्वांचं प्रेम आमच्यासोबत आहे. जे दगाफटका करतात, पळून जातात ते जिंकत नाहीत”. संजय राऊतांना ईडी नोटीस मिळाल्यासंबंधी बोलताना हे राजकारण नाही, आता सर्कस झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
उदय सामंतदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “हा त्यांचा निर्णय आहे. पण कधीतरी त्यांना समोर यावं लागणार आहे. त्यांना कधीतरी आमच्या डोळ्यात डोळे घालून पहावं लागणार आहे. तेव्हा पाहूयात”.
“जे पळून गेले आहेत ते स्वत:ला बंडखोर म्हणत आहेत. जर त्यांना बंड करायचं होतं तर इथेच करायला हवं होतं. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. जेव्हा ते आमच्यासमोर असतील तेव्हा डोळ्यात डोळे घालून काय चूक केली हे सांगावं लागेल ती दुसरी परीक्षा असेल,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी नेरळमधील मारहाण झालेल्या शिवसैनिकांची घेतली भेट
आदित्य ठाकरे यांनी नेरळमधील मारहाण झालेल्या शिवसैनिकांची पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात भेट घेतली. फुटीर आमदारांच्या लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला पण आमचे शिवसैनिक पुरून उरले असं यावेळी ते म्हणाले. शांतता पाळा, कायदा सुव्यवस्था ठेवण्याची गरज आहे असं आवाहनही त्यांनी केलं. काही फुटीर आमदार ज्यांच्यात बंड करण्याची हिंमत नाही ते पळून गेले आहेत. खरंच हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं असं आव्हान यावेळी त्यांनी दिलं.