‘आदर्श’ घोटाळ्यात विलासराव देशमुख यांचे नाव आले, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाही विविध आरोप आणि टीकेला सामोरे जावे लागले, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांची रवानगी थेट तुरुंगात झाली, निकटवर्तीयाला ३० कोटींची लाच घेण्याच्या आरोपांवरून झालेली अटक व त्यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होणारे आरोप .. समुद्रकिनारी असलेल्या या आलिशान शासकीय बंगल्यात वास्तव्य करणारे अलीकडच्या काळातील सारेच नेते विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरले आहेत. यामुळेच ‘रामटेक’ बंगला आणि वादग्रस्तपणा ही जणू प्रथाच पडली आहे.
मलबार हिल परिसरातील नारायणराव दाभोळकर मार्गावरील ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याचे साऱ्याच सत्ताधाऱ्यांना आकर्षण असते. नवे सरकार आल्यावर प्रत्येकाचा या बंगल्यावर डोळा असतो. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानापेक्षा समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला नेहमीच उजवा ठरतो. या बंगल्यात वास्तव्य असणारे अलीकडच्या काळातील सारेच नेते वादग्रस्त ठरू लागले आहेत. आता हा वास्तुदोष आहे की अन्य काही, याचा शोध नेत्यांना घ्यावा लागणार आहे.
विलासराव देशमुख यांचे अनेक वर्षे या बंगल्यात वास्तव्य होते. ‘आदर्श’ प्रकरणात नाव आल्यापासून विलासराव देशमुख पार खचले होते. युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांचे या बंगल्यात वास्तव्य होते. मुंडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप या काळात झाले. टीकेला सामोरे जावे लागले. आघाडीचे सरकार आल्यावर छगन भुजबळ यांचे वास्तव्य या बंगल्यात होते. तेलगी घोटाळ्यातून सहीसलामत सुटले तरी महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना थेट तुरुंगाची हवा खावी लागत आहे. युतीचे सरकार आल्यावर खडसे यांच्या वाटय़ाला हा बंगला आला. ३० कोटींच्या लाच मागितल्याच्या तक्रारीवरून खडसे यांच्या निकटवर्तीयाला पकडण्यात आले. ही लाचेची रक्कम खडसे यांच्यासाठीच जमा करण्यात येत होती, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खडसे यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार केले. यातून खुलासे करण्याची वेळ खडसे यांच्यावर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा