मुंबई : पर्यावरण संवर्धनाला स्वत:पासूनच सुरुवात करायला हवी. प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन दैनंदिन वापरातील एकल वापर प्लास्टिकच्या वस्तू, विजेचा अतिरिक्त वापर टाळावा , पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर संकुलातील झाडांसाठी करावा. प्रत्येक नागरिकांची ही कृती पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शनिवारी केले.

दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रियदर्शनी पार्क येथे ‘संवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईमधील हवा प्रदूषण, सांडपाणी शुद्धीकरण, घनकचरा, प्लास्टिक कचरा, सागरी किनारा मार्गाच्या सभोवती प्रस्तावित असलेले उद्यान अशा पर्यावरणविषयक विविध बाबींवर सिद्धेश कदम यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

मुंबईतील हवा प्रदुषणासाठी बांधकाम चालू असलेल्या इमारतींनी हवा प्रदूषण होवू नये म्हणून घ्यावयाची दक्षता, रेडी मिक्स प्लांटला अच्छादन करणे बंधनकारक केले असून, रेडी मिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबींसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला यापूर्वीच निर्देश दिले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर महानगरपालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेचे काम प्रगतीपथावर असून, ते वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई शहरातील हवेचे प्रदूषण विहित मर्यादेत ठेवण्यासाठी इमारत बांधकाम क्षेत्रासाठी काही नियोजन करता येईल का, त्याचबरोबर दिवसातील काही कालावधीसाठी नो व्हेईकल झोन असे काही करता येवू शकेल का याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांबरोबर पर्यावरणविषयक प्रश्नांबाबत संवाद यात्रचे प्रथमच मुंबई शहरात आयोजन करण्यात आले होते. या संवाद यात्रेला उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना कदम यांनी उत्तरे दिली. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबत करीत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहितीही नागरिकांना देण्यात आली. संवाद यात्रेचे आयोजन करण्यामागे दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या सचिव सुशीबेन शहा यांनी पुढाकार घेतला होता . यानंतरही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर अशा संवाद यात्रेचे भविष्यात आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या वतीने नागरिकांना देण्यात आली. संवाद यात्रा कार्यक्रमाला राज्यसभा खासदार मिलिंद देवरा आणि दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात वरळी , कफ परेड , शिवडी,कुलाबा, मलबार हिल, पेडर रोड येथे रहिवासी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.