मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत सर्व विभागीय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी तपासणी आणि धडक कारवाईला सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत कल्याण येथून सुमारे १.४५ टन एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाला येथील म्हारळ गावात अवैध एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची तात्काळ दखल घेत एकल वापर प्लास्टिकचे अवैध उत्पादन करणाऱ्या म्हारळ गावातील स्वरुप कम्पाऊंडमधील मे. नेहा प्लास्टिक कारखान्यावर मंडळाने छापा टाकला. याकारखान्यात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. मंडळाने केलेल्या चौकशीत संबंधितांकडे कारखाना सुरू करण्याचे कोणतेही संमतीपत्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, कारखान्यातून १.४५ टन प्लास्टिकच्या पिशव्या व इतर अवैध प्लास्टिक घटक जप्त करण्यात आले. जप्त केलेले प्लास्टिक म्हारळ ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले असून जप्त प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
हे ही वाचा…हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा
दरम्यान, मुंबई बरोबरच इतर क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडून वारंवार जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहिमा राबविल्या जात आहेत. परंतु अनेक भागात एकल वापर पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.
हे ही वाचा…मुंबई : चाकूने हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना १२ तासांत अटक
एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. प्लास्टिकची पिशवी, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचे वेष्टन, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बॅनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.