मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ होत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वीच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. मात्र, सध्या वायू प्रदूषणात झालेली वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडिमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी (आरएमसी) नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध बांधकाम क्षेत्र, विकास कामे, स्टोन क्रशर, बेकरी आणि रेडिमिक्स कारखाने यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. दरम्यान, सध्या मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा वेग आणि रेडिमिक्स सिमेंट कारखान्यांमुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण ही समस्या गंभीर असल्याने मंडळाकडून तातडीने नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार नियोजित असलेल्या कमीतकमी २० हजार चौरस मीटर बांधकाम प्रकल्प क्षेत्रामधील जागेत कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी दोन हजार वर्ग मिटर राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये देशभरात अपेक्षित थंडी नाहीच; जाणून घ्या, थंडी, थंडीच्या लाटांबाबत हवामान विभागाचा अंदाज

कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना पुढील तीन महिन्यांच्या काळात पूर्णत: बॉक्ससारखे आच्छादन करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी १० लाखा रुपयांची बँक हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे. तसेच एखादया बांधकाम प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असेल तर, तेथील कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट कारखाना एक महिन्याच्या कालावधीत स्थलांतरित करणे आवश्यक आहे. नवीन रेडिमिक्स कारखाना महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रात उभारावयाचा असल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची परवानगी आवश्यक आहे. याचबरोबर नवीन व्यावसायिक प्रकल्पांना एक हजार वस्ती असलेल्या क्षेत्रापासून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा प्रमुख रस्ते यापासूनचे अंतर ५०० मीटर असणे आवश्यक आहे. तसेच शाळा, कॉलेज, रुग्णालय व न्यायालयापासूनचे अंतर ५०० मीटर असणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> अनधिकृत बांधकामावरील कारवाईला मालाडमध्ये विरोध; बांधकाम करणाऱ्याने स्वतःच्या डोक्यात वीट मारून घेतली

नवीन व्यावसायिक प्रकल्पासाठी महापालिका, नगर परिषद क्षेत्राबाहेरील प्रकल्पांना कमीतकमी ४ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. सुरुवातीपासूनच स्थापित असलेल्या व्यावसायिक आरएमसी प्रकल्पांना पुढील ३ महिन्यात पूर्णत: बॉक्स टाईप आच्छादन करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी २५ लाख रुपये बँक हमी देणे आवश्यक आहे. तसेच सुरुवातीपासूनच व्यावसायिक प्रकल्पासाठी स्थापित असलेल्या आरएमसीच्या क्षमता वाढीस बंदी असेल.

दरम्यान, रेडिमिक्स सिमेंट कारखान्यांमुळे निर्माण होणारी हवा प्रदूषणाची समस्या नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक अधिसूचना २०१६ मध्येच जाहीर केली आहे. मात्र, सध्यस्थितीत मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मंडळाने नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. रेडी मिक्स कारखाने, स्टोन क्रशर, बेकरी किंवा अन्य उद्योगातून वायू प्रदूषण झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pollution control board issue new guidelines to prevent air pollution mumbai print news zws