मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील (शिवाजी पार्क) माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असून गेल्या अनेक दिवसांपासून तेथील स्थानिक रहिवासी धुळीला तोंड देत आहेत. मैदानाची पाहणी केल्यानंतर मुंबई आयआयटीने आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचे क्षेत्र वगळता संपूर्ण मैदानात पूर्ण प्रमाणात गवताची लागवड करावी असा आदेश मुंबई महापालिकेला दिला आहे.
शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षात सोडवता आलेला नाही. दरवर्षी हिवाळा आला या मैदानातील माती हवेत उडू लागते व त्याचा तेथील रहिवाशांना त्रास होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ६ जानेवारीला अधिकाऱ्यांसह शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली होती. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत पंधरा दिवसांत महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेशही कदम यांनी महानगरपालिकेला दिले होते. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने या प्रश्नावर आयआयटी मुंबईचे मत घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार आयआयटीने या मैदानाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. अहवालानुसार माती न काढण्याची शिफारस आयआयटीने केली होती. दरम्यान, शिवाजी पार्क येथील माती न काढण्याचा निर्णय एकमताने झाल्यानंतर आता संपूर्ण मैदानात गवताची लागवड करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले आहेत. त्यात क्रिकेट खेळपट्ट्यांचे क्षेत्र वगळता इतर सर्व भागात पावसाळ्यापूर्वी गवताची लागवड करायची आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मैदानात कोणत्या प्रजातीचे गवत योग्य आहे याची तपासणी करून त्याचा अहवाल महापालिकेने एमपीसीबीला द्यावा आणि मगच त्या प्रजातीच्या गवताची लागवड करावी असेही सांगण्यात आले आहे. तसेच कृतीचा अंतिम आराखडा सादर करावा ज्यात लागवड केलेल्या गवताचा प्रकार, क्रिकेट खेळपट्टी क्षेत्र वगळता संपूर्ण उद्यानासाठी गवत लावण्यासाठी लागणारा कालावधी, देखभालीचे वेळापत्रक आणि पाण्याचा स्त्रोत यांचा समावेश असावा.
शिवाजी पार्क मैदानातील धूळ कमी करण्यासाठी महापालिकेने मैदानाच्या परिसरात स्थानिक प्रजातींची उंच झाडे लावावीत अशी सूचनाही एमपीसीबीने दिली आहे. तसेच आदेशाचे पालन न केल्यास कोणतीही सूचना न देता कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, या मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. मैदानातील धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. पालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची पेरणी केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले होते.