पश्चिम विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई तसेच मुंबई उपनगर परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अगदी जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशाराही हवामान खात्याने दिलाय. ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरांतही हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या पश्चिमेकडील काही भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये पुढील २४ तास संततधार पाऊस सुरु राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस (१५ सेंटीमीटरपेक्षा कमी) पडण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात आलंय.
Maharashtra: Due to a low-pressure area over western parts of Vidarbha, rainfall activity over Mumbai & its suburbs would continue during next 24 hours leading to moderate rain at most places with heavy to very heavy rainfall (less than 15cm) at isolated places, as per IMD
— ANI (@ANI) August 31, 2021
गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. सोमवारी (३० ऑगस्ट) संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला. मुंबई आणि पुण्यात हलक्या सरी कोसळल्या.
हवामानाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस अनेक भागांत पाऊस हजेरी लावणार असल्याने काही ठिकाणी तरी हंगामातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची आशा आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत काही भागांत या दोन दिवसांत मुसळधारांची शक्यता आहे.
पाणीसाठ्याची चिंता…
यंदा १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने पाणीसाठ्याबाबत अद्यापही चिंता कायम असून, आठवड्यापासून पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. राज्यातील सर्व धरणांत मिळून गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किती पाऊस?
ऑगस्ट महिन्यांत पावसाला कमी कालावधीसाठी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली होती. कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील तुरळक भाग वगळता इतर कोणत्याही भागांत या महिन्यात मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. परिणामी एकूण १६ जिल्हे पावसात मागे पडले. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, मुंबई आणि पुणे शहरातील पाऊसही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मागे पडला आहे. या सर्वांचा परिणाम राज्यातील पाणीसाठ्यावर झाला आहे. गतवर्षी याच वेळी राज्यातील सर्व धरणांत मिळून ७६.७४ टक्के पाणीसाठा होता. तो सध्या ६०.५८ टक्क्यांवर आहे.
कुठे कमी पाऊस पडला?
मुंबई शहरातील पाऊस सरासरीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उणा आहे. पुणे शहरात ऑगस्टअखेर ४३५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना तो चारशे मिलिमीटरचा टप्पाही पूर्ण करू शकलेला नाही. पुणे जिल्ह्यात १ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मराठवाड्यातील हिंगोली, कोकण विभागातील पालघर आदी जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे.