मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही ठिकाणी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी बिगर मोसमी पाऊस पावसाचा तडाका बसला. या पावसामुळे सांगली आणि परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. रब्बी पिकांच्या पेरणीतही अडथळा निर्माण होणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून राज्याच्या दक्षिण भागात बाष्पीयुक्त वारे येत आहेत. शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर, सांगली जिल्ह्याचा घाट परिसर आणि तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, रहिमतपूर या तालुक्यांमध्ये काही मुसळधार, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. या बिगर मोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या आणखी रखडण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणच्या पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे द्राक्ष पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता जास्त आहे.