मोफत पुस्तकांसाठी वाचक कर्मचाऱ्यांची झुंबड

मुंबई : दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभरात साजऱ्या झालेल्या ‘वाचनध्यासा’बरोबरच मंत्रालयाच्या ‘त्रिमूर्ती प्रांगणा’तही ‘वाचनतास’ साजरा करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांना पाहून ‘माय मराठी’ला सोमवारी वेगळाच अनुभव आला!

सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या ‘वाचनतास’ उपक्रमात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अभ्यागतांनी एक तास तरी शांतपणे वाचन करावे, अशी अपेक्षा होती, पण असा वाचनध्यास माय मराठीला दिसलाच नाही. उलट, हाती येतील तेवढी पुस्तके उचलून घरी घेऊन जाण्यासाठी अनेक स्टॉल्सवर उडालेली झुंबड पाहताना, माय मराठी अचंबित झाली. ‘डोईवर सुवर्णमुकुट आणि अंगावर लक्तरे लेवून वर्षांनुवर्षे मंत्रालयाच्या दारी उभ्या असलेल्या माय मराठीला’ बहुधा प्रथमच मंत्रालयाच्या प्रांगणातच मराठीप्रेमाचा वेगळाच महापूर अनुभवता आला..

राज्यात सोमवारी गावागावांत ‘वाचनध्यास’ उपक्रम राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले, तसेच मंत्रालयाच्या प्रांगणातही ‘वाचनतास’ नावाचा उपक्रम आयोजित केला. सकाळी उपक्रमाचा प्रारंभ करताना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थितांसमोर पु. ल. देशपांडे यांच्या ‘श्रोते हो’ या संकलित भाषणांचे वाचन केले आणि पाठोपाठ प्रांगणात वाचकांची झुंबड उडाली. काही स्टॉल्सवरील निवडक सरकारी प्रकाशने वगळता, इतर अनेक स्टॉल्सवर पुस्तके मोफत आहेत, ही वार्ता वाऱ्यासारखी प्रांगणात पसरली आणि फुकटात मिळणाऱ्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर गर्दी सुरू झाली. सुरुवातीस काही वाचकांनी निवडून निवडून पुस्तके काखोटीस मारली. हातात पुस्तकांचे ढीग घेतलेल्या वाचनप्रेमींना पाहून माय मराठीला अक्षरश: भरते आले..

‘त्रिमूर्ती प्रांगणा’त पुलंच्या भाषणाचे वाचन करून तावडे यांनी गिरगाव आणि मरिन लाइन्स येथील पोलीस चौकीला भेट दिली आणि तेथील वाहतूक पोलिसांना पुस्तके भेट दिली. ‘पोलिसांनीसुद्धा वेळात वेळ काढून पुस्तके वाचावीत’ असा संदेश तावडे तिकडे पोलिसांना देत होते, तेव्हा इकडे त्रिमूर्ती प्रांगणात पुस्तकांवर अक्षरश: उडय़ा पडत होत्या. सुरुवातीस अनेक जणांनी मोफत पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी करून दर्जेदार पुस्तकांचे ढीग काखोटीस मारल्याने काही वेळातच पुस्तके संपली आणि नवा ‘स्टॉक’ आणावा लागला. अशा प्रकारे, पुस्तके स्टॉलवर येत आहेत आणि ती हातोहात उचलली जात आहेत हे पाहून माय मराठीचा आनंद बहुधा गगनात मावेनासा झाला होता.

संध्याकाळी साडेपाच वाजता वाचनतास उपक्रमाची सांगता झाली.. प्रांगणातच तासभर बसून पुस्तकाचे वाचन करावे, अशी अपेक्षा असताना, एका तासाचा ‘वाचनध्यास’ पुरेसा नाही या जाणिवेने बहुधा वाचकांनी पुस्तके उचलून घरी नेल्याने, मराठीला चांगले दिवस आल्याच्या भावनेने स्वत:चे समाधान करून घेत आणि डोईवरचा सुवर्णमुकुट सावरून माय मराठी पुन्हा मंत्रालयाच्या दारी उभी राहिली..

वाचकांचा ‘मळा’..

राज्य शासनाच्या प्रकाशनांपैकी काही संदर्भ ग्रंथ, माहितीपूर्ण ग्रंथ सवलतीत उपलब्ध होते. मात्र, ती पुस्तके मोफत नाहीत असे कळताच तिकडची गर्दी फुकट पुस्तकांच्या स्टॉलकडे वळली.

संध्याकाळी साडेचार-पाच वाजेपर्यंत सर्व स्टॉलवरील साठा रिता झाला होता आणि सरकारी प्रकाशनांच्या विकतच्या पुस्तकांच्या स्टॉलवरील कर्मचारी मात्र, वाचकांची वाट पाहात बसूनच राहिले होते.. कवितांची पुस्तके असलेल्या स्टॉलकडे तर   फारसे कुणी फिरकलेच नाही..