देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ असल्याने देशाच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तर वा दक्षिण कोणत्याही भागांतील निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला साहजिकच महत्त्व प्राप्त होते. आताही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईसह राज्याच्या अन्य भागांतून मोठी ‘कुमक’ जाणार आहे.
गेल्या वर्षी गुजरातच्या निवडणुकांच्या वेळी मुंबईतील गुजराती भाषकांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला होता. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या मदतीसाठी मुंबई व राज्याच्या अन्य भागातून कार्यकर्ते गेले होते. तसेच धनशक्तीही मुंबईतून पाठविण्यात आली होती. राजस्थान निवडणुकीकरिता आता मुंबईतील राजस्थानी उद्योगपतींची मदत घेण्यात येत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी यासाठी तसे प्रयत्न सुरू केले आहेत. योगायोगाने राजस्थान काँग्रेसचे प्रभारीपद मुंबईतील खासदार गुरुदास कामत यांच्याकडे आहे. पक्षव्यवस्थापनात कामत हे माहिर मानले जातात. कामत यांची कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली आहे. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांच्या पुढाकाराने मुंबईत भाजपने राजस्थान निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांकडे राजस्थानच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पुरोहित यांनी सांगितले.
मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांसाठी या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या विदर्भातील कार्यकर्त्यांची कुमक प्रचाराला जाणार आहे. भाजपबरोबरच काँग्रेसनेही आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविली आहे. दिवाळीनंतर कोणी कोठे प्रचाराला जायचे हे ठरवून देण्यात आले आहे. दिल्ली भाजपची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावरच आहे. दिल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रचाराला जाणार आहेत. मराठी भाषकांची संख्या जास्त असलेल्या इंदूर आणि ग्वाल्हेर या पट्टय़ात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत.
कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसमध्ये मुंबईला विशेषच महत्त्व प्राप्त होते. खर्चाचा भार मुंबईने उचलावा अशा अलिखित सूचना असतात. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिल्डरांच्या विरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे काँग्रेससाठी पूर्वीएवढे सोपे राहिलेले नाही, अशी माहिती काँग्रेसच्याच एका बडय़ा नेत्याने दिली. मुंबईतील बडय़ा उद्योगपतींना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी हाताशी धरल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा