महाराष्ट्र सदन प्रकरणाशी संबंधित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य वास्तुरचनाकार बिपिन संख्ये यांचे गुरुवारी निधन झाले. प्रदीर्घ काळापासून ते आजारी असले तरी या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दोन-तीन वेळा चौकशीसाठी जावे लागल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण होता. महाराष्ट्र सदन प्रकरणात वास्तुरचनाकार म्हणून खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली असताना आपल्याला गोवण्यात आले, असे संख्ये यांचे म्हणणे होते.
महाराष्ट्र सदन प्रकरणात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये संख्ये यांचा समावेश होता. महाराष्ट्र सदन प्रकरणात प्रत्यक्षात बी. जी. पत्की आणि कंपनी वास्तुरचनाकार म्हणून काम पाहत होते.
आपला काहीही संबंध नसल्याचे संख्ये यांनी स्पष्ट केले होते. परंतु एसीबीचे अधिकारी ऐकत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीनेही एसीबी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला होता. आधीच आजारी असलेल्या संख्ये यांना हा ताणही जाणवत होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.