महाराष्ट्र सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया – बेलापूरदरम्यान वॉटर स्टॅक्सी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्या असून नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सेवा दोन-तीन दिवसांमध्ये सुरू होत असून गेट वे ऑफ इंडिया येथून जलमार्गे एका तासात बेलापूरला पोहोचण्याचे प्रवाशांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
नयनतारा कंपनीने २०० प्रवासी क्षमतेची देशातील सर्वात मोठी वॉटर टॅक्सी सज्ज केली आहे. ही वॉटर टॅक्सी मागील काही महिन्यांपासून मुंबई – मांडवा आणि बेलापूर – मांडवा जलमार्गावर धावत आहे. या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. असे असले तरी गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर अशी सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मंडळींकडून ही मागणी होत आहे. ही मागणी लक्षात घेऊन गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी नयनतारा कंपनीने परवानगी मागितली होती. मात्र काही कारणांमुळे ही परवानगी मिळत नव्हती आणि त्यामुळे एका तासात वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडिया येथून बेलापूर गाठण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत होती.
आता मात्र प्रवाशांची प्रतीक्षा संपली असल्याची माहिती नयनतारा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. आता केवळ पुढील प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी किंवा गुरुवारी ही सेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सोमवार ते शुक्रवार दोन फेऱ्या
गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर जलमार्गावर २०० प्रवासी क्षमतेच्या वॉटर टॅक्सीची दिवसाला दोन फेऱ्या होतील.
ही वॉटर टॅक्सी आठवड्यातील पाच दिवस सोमवार ते शुक्रवार अशी धावणार आहे.
शनिवार-रविवार हा जलमार्ग बंद असेल.
सकाळी ८.३० वाजता बेलापूर जेट्टीवरून वॉटर टॅक्सी सुटेल आणि ती सकाळी ९.३० वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहचेल.
सायंकाळी ६.३० गेट वे ऑफ इंडिया वरून वॉटर टॅक्सी सुटेल आणि बेलापूर जेट्टीवर सायंकाळी ७.३० वाजता पोहचेल.
या सेवेसाठी प्रवाशांना ३०० आणि ४०० रुपये मोजावे लागतील.