राज्यभरातील धरणांतील पाणीसाठा खालावत चालल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र होऊ लागली आहे. पाणीपुरवठय़ासाठी दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. पाणी आणि चाऱ्यासाठी राज्यातील जवळपास साडेचार लाखांहून अधिक जनावरांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यावर राज्य सरकारने आता भर दिला आहे.
सह्य़ाद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार १६६३ गावांमध्ये व ४४९० वाडय़ांमध्ये भीषण पाणीटंचाई असल्याचे सांगण्यात आले. या गावांना २१३६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक टंचाईग्रस्त गावांची आणि त्याबरोबर टँकरची संख्याही वाढत आहे.राज्यातील २,४७५ सिंचन प्रकल्पांत सरासरी ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात ४० टक्के पाणीसाठा होता. पावसाळ्यापर्यंत अजून चार महिने काढायचे आहेत. धरणांतील पाणीसाठा खालावत चालल्याने टंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आता पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहतील यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी उस्मानाबादला ५१ कोटी रुपये व जालना शहराला ४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्य़ातील जत येथील बिरनाळ तलावात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आणून सोडण्यासाठी २५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एकंदरीत टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने ४१३ कोटी ९८ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

Story img Loader