काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोष होत असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे मात्र काँग्रेसजन अडचणीत आले. दहशतवादाला धार्मिक रंग चढविण्याच्या शिंदे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार करीत शिंदे यांचा निषेध केला.
सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात, पण असे बेताल वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रास लाजेने मान खाली घालावयास लावले, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली, तर हिंमत असेल तर  शिंदे यांनी भगव्या दहशतवादाचे पुरावे द्यावेत असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिले. भाजपवर हिंदू दहशतवादाचा आरोप करणाऱ्या शिंदे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करावीच, असे आव्हान तावडे यांनी दिले. दहशतवादाला धर्म नसतो, पण शिंदे यांनी मात्र दहशतवादावर भगवा रंग चढविला, त्यामुळे मला त्यांची कीव येते, अशी खिल्लीही तावडे यांनी उडविली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवे चैतन्य मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला, तर राहुल यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला जनताभिमुख पक्ष बनविण्याच्या सोनिया गांधी यांच्या संकल्पास नवे बळ मिळेल, असे प्रदेश काँग्रेसचे संजय दत्त म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर मात्र संजय दत्त यांनी मौन पाळले.

Story img Loader