‘मेक इन इंडिया’मध्ये महाराष्ट्राचे ६.११ लाख कोटींचे करार
‘मेक इन इंडिया’ सप्ताह प्रदर्शनाच्या मंचावर महाराष्ट्राने गुंतवणुकीतील अग्रेसरता नोंदविताना सोमवारी तब्बल २,४६३ करार केले. येत्या काही वर्षांमध्ये प्रत्यक्षात येणारे याबाबतचे प्रकल्प, योजना या सुमारे ६.११ लाख कोटी रुपयांच्या असून यामाध्यमातून राज्यात २८ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.
भारतीय उद्योग महासंघ व औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या वतीने वांदे – कुर्ला संकुलाच्या एमएमआरडीए मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्राने विविध क्षेत्रातील तसेच राज्याच्या विविध भागातील गुंतवणुकीचे करार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. यामध्ये महिंद्रा समूह, मर्सिडिज बेन्झ, उत्तम गालवा, पॉस्को, सॅन्डिस्क, गोदरेज, सुदर्शन केमिकल्स, इकोसॉफ्ट, आर्च इन्फ्रा, जेएसडब्ल्यू, फोक्सव्ॉगन, ईटीएम प्रोजेक्ट्स, तरुल इंडिया आदी कंपन्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाबरोबर गेल्या काही महिन्यांमध्ये ४०० करार, गेल्या दोन दिवसात तीन करार तर लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात २०० करार झाल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी यावेळी दिली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी महाराष्ट्राचे ५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक उद्दीष्ट येत्या दोन वर्षांतच पूर्ण होणार असल्याचा विश्वास करत पाच वर्षांत दुप्पट लक्ष्य राखण्यात आल्याचे जाहीर केले. राज्यात व्यवसायपूरक वातावरणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
पाच क्षेत्रातील धोरणे जाहीर
किरकोळ विक्री, अनुसूचित जाती/जमाती, परवाने व मंजुरी, बंदरे तसेच ईलेक्ट्रॉनिक – फॅब या पाच क्षेत्रातील नवीन धोरणे राज्य शासनाने सोमवारी जाहीर केली.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात एवढय़ा प्रमाणात प्रथमच गुंतवणूक येत आहे. एकत्रित येणारी ही गुंतवणूक राज्याच्या सर्व भागात असेल. गुंतवणूकविषयक करण्यात आलेल्या करारानंतर प्रत्येक गुंतवणूक ही लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाचे प्राधान्य असेल. येत्या काही दिवसात गुंतवणुकीचे आणखी काही करार केले जातील.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader