राज्य सरकारने मान्यता दिलेल्या एसटी कामगारांच्या प्रस्तावित कराराबाबत कामगारांचा कौल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने ३० मार्च आणि १७ एप्रिल असे दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २० विभागांतील २१० तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १० विभागांतील १०९ ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे. हे मतदान कोणत्याही कामगार संघटनेच्या विरोधात नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात याच संघटनेमध्ये फूट पडली असून खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली नवी संघटना स्थापन करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या कामगारांच्या प्रस्तावित वेतन करारामध्ये १० टक्के वाढ देण्यात आली असून त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष सरकारला कळविण्यासाठी कामगारांचा कौल जाणून घेण्यात येत असून महामंडळातील ३० विभागांतील ३१९ ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यास कुठेही मतदान करता येणार आहे. ‘महाराष्ट्र कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम १९७१’ या कायद्यान्वये संप करायचा असल्यास सर्व कर्मचाऱ्यांचा कौल जाणून घेणे आवश्यक असल्यानेच हे मतदान घेण्यात येत असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला. दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या नव्या संघटनेच्या सरचिटणीसपदी श्रीरंग बरगे यांनी निवड करण्यात आली आहे. नव्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची भेट घेऊन संघटना स्थापनेचे पत्र सादर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा