मुंबई : राज्य सरकारने दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला. मात्र त्यात एसटी महामंडळाला अंदाजे १०० कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसला मुकावे लागणार असून शासनाने एसटीचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व शासकीय कार्यालये, महामंडळात दिवाळी बोनसच्या चर्चा रंगलेल्या असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस मिळणार का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरवर्षी दिवाळीच्या हंगामात एसटीची भाडेवाढ करण्यात येते. दिवाळी हंगामी भाडेवाढ मधून एसटीला साधारण शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण भाडेवाढ मागे घेतल्याने महसूलापासून मुकावे लागले आहे. सध्या महामंडळाच्या बस खचाखच भरून रवाना होत असल्या तरी प्रत्यक्ष एसटीच्या तिजोरीत अर्ध्यापेक्षाही कमी रक्कम जमा होते. त्यातून दैनंदिन खर्च भागविला जातो. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलत मूल्याची रक्कम शासनाकडून दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी थकली असून फक्त पगार होईल एवढीच रक्कम महामंडळाला दरमहा शासनाकडून दिली जात आहे.

हेही वाचा : मुंबई: वांद्रे येथील बॉलीवूड थीम पार्कच्या कामाला वेग

दिवाळी बोनससाठी खर्च करायचा असल्यास महामंडळासमोर शासनाकडे हात पसरविल्या शिवाय पर्याय नाही. यावर्षी असाच पेच निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांच्या रक्कमेची मागणी करणारा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे हंगामी भाडेवाढीतून मिळणारे १०० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न मिळणार नसून ही रक्कम शासनाने महामंडळाला द्यावी किंवा दिवाळीसाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून प्रवाशांप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता येईल, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले. दिवाळी बोनस नेमके कधी मिळणार या विषयीची उत्सुकता कर्मचाऱ्यांना असून राज्य सरकारच्या आदेशाने रद्द करण्यात आलेल्या हंगामी भाडेवाढीची प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ महामंडळाला वर्ग करावी. जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागेल, असे बरगे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra st employees congress demand diwali bonus for st employees mumbai print news css