मुंबई : डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. कमाल – किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी, या काळात उत्तरेत थंडीच्या लाटाही सरासरीपेक्षा कमी येतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, डिसेंबर महिन्यात देशातील कमाल – किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतात थंडीच्या लाटांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहील. रशिया, मध्य आशियातून येणाऱ्या पश्चिमी विक्षोपांची (थंड वाऱ्याचा झंझावात) संख्याही सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, या थंडीच्या तीन महिन्यांत कमाल – किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. डिसेंबरमध्ये देशभरात सरासरी १५.९ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा तो सरासरीच्या १२३ टक्के पडण्याचा अंदाज आहे. मध्य भारतापासून दक्षिणेत सर्वदूर डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही डिसेंबरमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील झोपड्यांचे पुनर्वसन करून अतिरिक्त धावपट्टीमध्ये वाढ करा; खासदार रवींद्र वायकर यांची केंद्र सरकारकडे मागणी

ला – निनाची पुन्हा हुलकावणी

जुलै महिन्यापासून जगभरातील विविध हवामान विषयक संस्था, संघटना प्रशांत महासागरात ला – निना सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. पण, नोव्हेंबरअखेरपर्यंत तरी ला – निना सक्रिय झालेला नाही. ला – निनाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत ला – निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. ला – निना देशात चांगल्या थंडीसाठी पोषक असतो. ला – निनाबाबत भारतीय हवामान विभागासह हवामान विषयक सर्वच जागतिक संस्थांचा अंदाज चुकल्याची कबुली महापात्रा यांनी दिली.

हेही वाचा – माता-बाल आरोग्याच्या ‘वात्सल्य’ योजनेस ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार!

नोव्हेंबरही राहिला सरासरीपेक्षा उष्ण

देशात नोव्हेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहिला आहे. नोव्हेंबर महिन्यात सरासरी किमान तापमान १५.८६ अंश सेल्सिअस असते, ते १६.९० अंश सेल्सिअस होते. सरासरी कमाल तापमान २८.७५ असते, ते २९.३७ अंश सेल्सिअस होते. १९०१ नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांधिक तापमानाची नोव्हेंबर महिन्यात नोंद झाले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये २९. ५४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. नोव्हेंबरमध्ये देशात पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडला. नोव्हेंबरमध्ये देशात सरासरी २९.७ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा १३.५ मिमी पाऊस पडला आहे. दिल्ली आणि परिसरात नोव्हेंबरमध्ये पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यामुळे धुके, धुरके आणि हवा प्रदूषणाचा सामना दिल्लीकरांना करावा लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state and india cold rain weather information mumbai print news ssb