मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादी सोमवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. पाचव्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या ९५ हजार ५५८ जागांसाठी एकूण ५ हजार ८२९ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ४ हजार ६२० विद्यार्थ्यांना महाविद्यालयात देण्यात आले. पाचव्या विशेष प्रवेश फेरीसाठी अर्ज केलेले जवळपास १ हजार २०९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ३ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, ३४३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १७६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही हे तपासून पहावे. सदर पाचव्या विशेष प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार, ११ सप्टेंबर (सकाळी १० वाजल्यापासून) ते शुक्रवार, १५ सप्टेंबर (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश फेरीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

हेही वाचा >>>मुंबई गोवा महामार्ग खरंच सुधारणार? रवींद्र चव्हाणांचा पाचवा दौरा!

पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चौथ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत पाचव्या विशेष प्रवेश यादीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची पाचवी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

पाचव्या विशेष प्रवेश फेरीनंतर फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ६९.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ५१.६० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असणार आहेत. चर्चगेटमधील के.सी. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ९२.८० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ६४.२० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील. विज्ञान शाखेसाठी चर्चगेटमधील जय हिंद महाविद्यालयात ५७.६० टक्के आणि माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात ६७.६० टक्यांवर प्रवेश पात्रता गुण घसरलेले आहेत. वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या माटुंग्यातील पोदार महाविद्यालयात ८१.८० इतके प्रवेश पात्रता गुण असतील. माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयात कला शाखेसाठी ४३.६० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ६५.४० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असणार आहेत. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८४.२० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ६७.४० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असणार आहेत. अंधेरीतील भवन्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८१.६० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ४६.४० टक्क्यांवर प्रवेश पात्रता गुण घसरले आहेत. विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८८.४० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ४८.०० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असणार आहेत. विज्ञान शाखेसाठी मुलुंडमधील वझे – केळकर महाविद्यालयात ५८.८० टक्के आणि ठाण्यातील बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात ६०.२० टक्के प्रवेश पात्रता गुण असणार आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर येथील सी. एच. एम. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ४७.६० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ४१.६० टक्के, वाशी येथील फादर अग्नेल मल्टीपर्पज महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ७३.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८३.८० टक्के, ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ६८.६० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ४३.४० टक्के आणि कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ७५.२० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८०.४० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील.

हेही वाचा >>>मुलुंडमधील एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालय नववर्षात रुग्णांच्या सेवेत; १२ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना होणार लाभ

पाचव्या विशेष प्रवेश फेरीत शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी

शाखा – उपलब्ध जागा – अर्ज केलेले विद्यार्थी – निवड झालेले विद्यार्थी

कला – १८ हजार १३७ – ५१४ – ४७१

वाणिज्य – ५० हजार ७६१ – ३ हजार १२२ – २ हजार ५६६

विज्ञान – २४ हजार ६३४ – २ हजार ३८ – १ हजार ४८२

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – १ हजार ९५० – ११२ – १०१

एकूण – ९५ हजार ५५८ – ५ हजार ८२९ – ४ हजार ६२०