मुंबई : मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे नाममुद्रा (ब्रॅण्ड) असलेले पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित अर्थात महानंदच्या वतीने आरे दूध पुन्हा बाजारात आणले जाणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री, महानंद आणि एनडीडीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आरे दूध वसाहत मुंबईच्या वतीने आरे नाममुद्रा असणारे आरे दूध, सुंगधी दूध, दही आदी उत्पादने १९५१ पासून मुंबईच्या बाजारात उपलब्ध होते. त्यानंतर काही वर्षे महानंदच्या वतीने आरेची उत्पादने बाजारात येत होती. २०१२ पासून सरकारला स्वामित्व धन (रॉयल्टी) देऊन कुतवळ फुडस् यांच्या वतीने आरे दूध वगळता सुंगधी दूध, श्रीखंड, आम्रखंड, दही आदी उत्पादने बाजारात येत होती. २०२१पर्यंत आरेची उत्पादने कमी अधिक प्रमाणात बाजारात होती. पण, राज्य सरकारने कुतवळ फूड्स यांच्याकडे १.३८ कोटी वरून २.५ कोटी रुपये स्वामित्व धनाची मागणी केल्यामुळे त्या कंपनीकडून होणारे उत्पादन बंद झाले. त्यामुळे २०२१पासून आरे ही नाममुद्रा बाजारातून हद्दपार झाली आहे.
मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार महानंदच्या माध्यमातून आरे दूध मुंबईच्या बाजारात आणले जाणार आहे. राज्य सरकार, महानंद आणि एनडीडीबीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच आरे दूध मुंबईच्या बाजारात उपलब्ध होईल. – डॉ. एन. रामस्वामी, सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास