मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळापेक्षा महायुती सरकारच्या काळात उद्याोगांमध्ये देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीत घट झाली आहे. देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक वाढत असल्याचे दिलासादायक चित्रही आहे. उद्याोग प्रोत्साहन व जलदगतीने सेवा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मैत्री’ कक्षाकडे तीन हजारांहून अधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात देशांतर्गत औद्याोगिक गुंतवणुकीचा विचार करता २०२१ मध्ये सुमारे दोन लाख, ७७ हजार ३३५ कोटी रुपये गुंतवणुकीच्या २७३ प्रकल्पांना, २०२२ मध्ये ३८ हजार ९८६ कोटी रुपये गुंतवणुकीच्या २३२ प्रकल्पांना तर २०२३ मध्ये ५९ हजार ५५१ कोटी रुपये गुंतवणुकीच्या २६४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. तर थेट विदेशी गुंतवणुकीची परिस्थिती पाहता २०२१-२२ मध्ये एक लाख १४ हजार ९६४ कोटी रुपये, २२-२३ मध्ये एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये आणि २३-२४ मध्ये एक लाख, ११२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

हेही वाचा >>>एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न कधी साकार?

विविध सामंजस्य करार

● राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जून २० मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जून २० ते मार्च २४ या कालावधीत राज्यात सात लाख १९ हजार १७२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आणि ७.५२ लाख रोजगारनिर्मितीचे १७७ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले होते.

● दावोस येथे २०२३ मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत एक लाख ३७ हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठीचे आणि एक लाखाहून अधिक रोजगार निर्मितीसाठी विविध क्षेत्रातील उद्याोगांशी १९ सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी ८० टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे.

दावोस येथे २०२४ मधील परिषदेत तीन लाख २३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे आणि दोन लाख रोजगारनिर्मिती क्षमतेच्या उद्याोगांसाठी १९ सामंजस्य करार केले.