मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून १९६९ साली सुरू झालेली ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद होण्याच्या मार्गावर असून सरकारकडून यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ बंद केल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येईल. त्यामुळे विचाराधीन असलेला बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन आणि आत्महत्या करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात संघटनेकडून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हेही वाचा – एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात
राज्य शासनाने लॉटरी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन लॉटरी प्रक्रिया सुरू राहण्यासाठी एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि यासंबंधित सर्व घटकांना चर्चेसाठी निमंत्रित करावे. शासकीय लॉटरी म्हणून लॉटरीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारला निर्णय घ्यायचा असल्यास विक्रेते एकत्रितपणे सहकारी तत्वावर ही लॉटरी चालविण्यास तयार आहेत, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने घेतली आहे.