दिवाळीनिमित्त पर्यटनासाठी आणि प्रवासासाठी निघणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १७,५५० जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा एसटी यंदा अडीच हजार जास्त गाडय़ा सोडणार आहे. या जादा गाडय़ांचे आरक्षण राज्यातील एसटीच्या आणि खासगी अशा सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असेल.
प्रवासी भारमान खालावलेल्या एसटीला ठराविक हंगामांमध्ये मात्र प्रचंड प्रतिसाद असतो. गणेशोत्सव आणि त्या खालोखाल दिवाळीच्या वेळी एसटीकडे प्रवाशांचा ओघ असतो. गेल्या वर्षीही दिवाळीत एसटीने १४,८६० जादा गाडय़ा चालवल्या होत्या. त्यांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने यंदा गाडय़ांच्या संख्येत वाढ केली आहे.
औरंगाबादमधील बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या विभागांतून ४७००, अमरावतीमधील अकोला, बुलडाणा, यवतमाळ या विभागांतून ८७५, मुंबईतील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या विभागांतून ३२५०, नागपूरमधील भंडारा, चंद्रपूर, वर्धा येथून ७७५, नाशिकमधील अहमदनगर, धुळे, जळगाव येथून ३३७५ अशा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तर पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतून ४५७५ गाडय़ा सोडल्या जातील.
दिवाळीपूर्वी पुण्याहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत प्रवाशांच्या मागणीनुसार यंदा या विभागातून १९८५ बसगाडय़ा सोडल्या जाणार आहेत. त्यात अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (संचेती चौक), स्वारगेट, मार्केटयार्ड, पिंपरी-चिंचवड या भागांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा