मुंबई : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यभरातील खासगी गोदामे भाडेपट्ट्याने घेऊन तीन लाख टन तूर साठवणुकीची तजवीज केली आहे. आधीच सोयाबीनच्या साठवणुकीमुळे वखार महामंडळाची गोदामे पूर्णपणे भरली असताना, तूर ठेवायला गोदामे नसल्यामुळे खरेदीला विलंबाने सुरुवात झाली. परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्याने खरेदीतील मोठा अडसर दूर झाला आहे.

वखार महामंडळाची एकूण साठवणूक क्षमता १८ लाख टन आहे, त्यापैकी सुमारे १२ लाख टन सोयाबीनची साठवणूक केल्यामुळे तूर खरेदी करून ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. वखार महामंडळाने विभागनिहाय जाहिरात प्रसिद्ध करून खासगी गोदामे भाडेपट्ट्याने घेऊन तूर खरेदीचे नियोजन केले होते. महामंडळाच्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, तीन लाख टन तूर खरेदीची तजवीज झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तूर खरेदी सुरू होते. यंदा १३ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. राज्याला २ लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. यापैकी सर्वाधिक खरेदी नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात होणार आहे.

अमरावतीत साठवणूक सुविधा अपुरी

अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला आदी जिल्ह्यांतून सर्वाधिक तूर खरेदी होणार आहे. परंतु नेमक्या याच जिल्ह्यांत तूर साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. याशिवाय खरेदीचे उद्दिष्टे २.९७ लाख टन असून, ३ लाख टनांच्या साठवणुकीची तजवीज झाली आहे. यामुळे उद्दिष्ट आणि साठवणुकीचे प्रमाण तंतोतंत आहे. दरम्यान, वखार महामंडळ आणखी साठवणुकीचे नियोजन करीत आहे. परंतु तूर उत्पादक पट्ट्यातच साठवणुकीची सोय करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वखार महामंडळाकडून सांगण्यात आले.वखार महामंडळाने विभागनिहाय जाहिरात देऊन खासगी गोदामांच्या मदतीने राज्यभरात तीन लाख टन तूर साठवणुकीची व्यवस्था केली आहे. अपवाद वगळता सोयाबीनची साठवणूक पूर्ण झाली आहे.

कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ.हमीभावाने तूर खरेदीचे गणित उत्पादनाचा अंदाज : ११ लाख ९० हजार १८६ टन खरेदीचे उद्दिष्ट : २ लाख ९७ हजार ५४६ टन. हमीभाव : ७,५५० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर : ७००० ते ७,२०० रुपये प्रतिक्विंटल खरेदीला सुरुवात : १३ फेब्रुवारीपासून

Story img Loader